मुंबई- राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाला सत्ता का गमवावी लागली, याचं चिंतन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा करतील तेव्हा करतील; परंतु राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींना त्यांची मोठी चूक दाखवून दिली आहे.
एका कुटुंबाने
काही केले नाही, असे म्हणत नरेंद्र
मोदी सातत्याने गांधी कुटुंबावर टीका करत राहिले. परंतु, आजच्या तरुण
मतदारांनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी किंवा अगदी राजीव गांधींनाही पाहिलेले नाही. त्यांनी
सोनिया गांधी आणि राहुल गांधींना पाहिले आहे. हे दोघेही सत्तेच्या खुर्चीवर नव्हते. त्यामुळे
त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करणे जनतेला रुचले नाही. उलट, साडेचार वर्षांपूर्वी विकासाबद्दल बोलणारे आता फक्त गांधी
कुटुंबावर हल्ला का करत आहेत, याबद्दल त्यांना
आश्चर्यच वाटले आणि ही टीकाच भाजपाला भोवली, असे मत शरद पवार यांनी मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी वापरलेल्या भाषेवरही त्यांनी टिप्पणी केली. आता तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी
घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने देणं अशोभनीय असल्याची चपराक त्यांनी लगावली.